रविवार, २३ डिसेंबर, २०१८

सिंह"गडाचे धडे"

पायथ्यापासून सिंहगडावर चालत जाण्याचा प्रवास सुद्धा जीवन संघर्षाची कित्येक गुपिते सोडवतो. पहिल्या पावलासोबत असणारा उत्साह पावला पावला गणिक वाढत जातो. पायथ्यापासून ना रस्ता दिसतो ना, ना वळण फक्त पुढे चालणारी काही माणसं.. काही आपल्या पुढे, काही आपल्या सोबत आणि काही मागाहून येणारी बऱ्याच वेळा समोर दोन-दोन, तीन-तीन वाटा दिसतात, जेव्हा कोणती वाट निवडावी असा प्रश्न पडतो तेव्हा आपल्या पायांच्या आणि मनाच्या निवडीची वाट एकच असेल असं नाही. पाय नेहमीच साधी सरळ वाट निवडू पाहतात मग ती लांब असली तरी चालेल पण तारुण्याच्या म्हणा किंवा उत्साहाच्या मनातल्या किड्याला ते पटत नाही. थोडी अवघड, आडवळणाची किंवा थ्रिल वाटावी अशी वाट तो निवडतो. सरळ उंच दगडांवर हात टेकत टेकत जरी चढू लागलो तरी पायांवर येणाऱ्या ताणामुळे हुसस्स आणि फुसस असे श्वासोच्छ्वास बाहेर पडू लागले की मग सुरू होतो संघर्ष. शेवटचा 20-30 मिनिटांचा टप्पा म्हणजे अगदीच क्रूर. वरती पोहोचून कट्ट्यावर बसलेली लोकं खालून येणाऱ्या लोकांची सर्कस पाहत असतात आणि खालून आपल्याला तो कट्टा खुणावू लागतो की बस्स आता थोडंच राहिलंय. गळून लटपटणारऱ्या आणि डळमळणाऱ्या पायांसोबत मनाचा उत्साह ही डळमळू लागतो की एवढ्या गुलाबी थंडीत रविवारच्या दिवशी मस्त पांघरून ओढून झोपायचं सोडून, एवढ्या हापसत हापसत सिंहगड चढायची कोठून दुर्बुद्धी सुचली. अगदी 10-15 मिनिटांच्या वाटेवर पाय साथ सोडून देतात आणि थांबावं लागतं. वर किल्ल्याकडे पाहून आपण वरती पोहचू की नाही अशी शंका मनात येऊ लागते तेव्हा. परतीच्या वाटेवरून उतरणारे एखादे आजोबा चेतवतात. "अ हं..सिंहगड चढताना वरती पाहायचं नाही..फक्त पुढचं पाऊल कुठे टाकणार आहात एवढंच पहायचं आणि चालत रहायचं...गडाची उंची पाहिली की पुढचं पाऊल टाकण्याचा उत्साह कमी होतो.. फक्त पुढच्या पावलाची उंची बघ.. गड कधी चढलो कळणार देखील नाही" मनाचा खेळ सगळा...! शेवटी त्या किल्ल्याच्या तटावर बसून "उगवत्या सूर्याला पाहण्याचा अवर्णनीय आनंद... त्याचा प्रत्येक किरण जणू सोबत संदेश घेऊन येत आहे... "तू सूर्य आहेस..!तुझा जन्मच मुळी संपूर्ण सृष्टी उजळविण्यासाठी झाला आहे...!"

 Facebook Post